शनिवार, १० सप्टेंबर, २०२२

दत्ताची आठवण

दत्तात्रय हेलसकर...
साने गुरुजी कथामालेसाठी आयुष्य समर्पित केलेला जिव्हाळ कार्यकर्ता शिक्षक....
५ सप्टेंबर २०१५ रोजी शिक्षक दिनी कार्यक्रमाच्या तयारीला मोटारसायकलवरून शाळेला जाताना अपघातात जखमी झाला. तीन दिवस मृत्यूशी झुंज देत देत अखेर ८ सप्टेंबर रोजी सकाळी दत्ता अनंताच्या प्रवासाकडे निघून गेला.
चिमण्या पाखरांच्या आनंदासाठी दत्ता मराठवाडाभर वणवण हिंडत राहिला. साने गुरुजींचा वसा -वारसा त्याने आपला श्वास म्हणून जपला - जगला.
कथामालेच्या माध्यमातून दत्तानं असंख्य गणगोत गोळा केलं. सर्व क्षेत्रातील गोतावळा हे त्याचं वैभव होतं.
४५ व्या वर्षीच इतका अफाट पसारा जोडून-सोडून तो गेला. तेव्हा मी अंदमानात असल्यानं त्याला शेवटचं पाहता आलं नाही हे दुर्दैव माझ्या मनात कायम सलत राहील. पण काल परवा आयुष्यात आलेला हा गोड माणूस माझ्या संचिताची समृद्धीच. माझ्यागत कैकांच्या काळजात घर करून आणि तहहयात पोकळी ठेवून दत्ता अकाली गेला.
एकदा अचानक देवगिरीने जाताना सेलूला स्टेशनवर त्यानं आणलेली ठेचा भाकरी ही आयुष्याची अखेरची शिदोरी ठरली.
दत्ताच्या गावी हेलसला गेलो होतो, त्याची ही जुनी आठवण....

दत्तात्रय हेलसकर : एक आठवण
(२०१४)
व्हाट्सपच्या निमंत्रणावरून, तेही ग्रुपवरील, मी संमोहितागत मंठा तालुक्यातील हेलस या गावी दत्तात्रय हेलसकरांच्या बहिणीच्या लग्नाला जाऊन आलो. ४ एप्रिल २०१४, शुक्रवारी. हेलसची माणसं, तिथली माणुसकी न् मानवता जपणारी घरं आणि माणसं इतक्या दूर आल्याचं सार्थकी समाधान पावलं मला. जालना जिल्ह्यातील खेड्यात जाण्याचा हा दुसरा प्रसंग. दहा-पंधरा वर्षापूर्वी हानमंत माळी या माझ्या मित्राला भेटण्यासाठी असाच वेड्यागत मोटार सायकलने गेलो होतो ! परतूर तालुक्यातील रोहिणा या गावाला. पण हानमंत माझा जुना मित्र. पंचवीस वर्षापासूनचा. वर्गमित्र. पण दत्ता हा काही जुन्या गणगोतातला दोस्त नाही. अगदी दोनेक वर्षापूर्वी ओळख झालेली, तीही फोनवर. प्रत्यक्ष आम्ही गेल्या डिसेंबरात एकमेकांना पाहिलं-भेटलो!
तरीही निव्वळ ग्रुपवरल्या निमंत्रणानं मी कसा गेलो, ते मलाही कळलं नाही. बायकोला न सांगता हे आणखी विशेष!
दत्ता हा माणूसच और आहे. तो फक्त एक व्यक्ती नाहीय. तर समता, बंधुता, करुणा या आंतरिक मूल्यांच्या शोधपूर्तीसाठी अव्याहत, अथक, अहर्निश धडपडणारी मानवी अस्वस्थता जगणारी प्रवृत्ती आहे तो. डिसेंबरात आम्ही नांदेडला भेटलो आणि जन्मोजन्मीचं नातं असल्यागत गुंतून गेलो आम्ही. त्याचं बोलणं, शब्दाशब्दातून झिरपणारी मुलांच्या (सर्वसामान्यांच्या, पोटच्या नव्हे!) कल्याणासाठीची तळमळ, तीही कुठल्याही, कसल्याही परताव्याची आस न ठेवता, मला नुसती भावलीच नाही तर या प्रवृत्तीनं भारावून टाकलं मला. या भारावलेपणात गेलो म्हूणून तर हेलसचं माणूसपण पाहता-अनुभवता आलं.
आदल्या रात्री झोपता झोपता नेट चालू करून बघितलं सहज. तर धाडधाड मेसेजचा धडाका! अचानक पुराच्या पाण्याचा लोंढा अंगावर यावा तसा. वाट्सपमध्ये ऊठसुठ तोंड खुपसून बसायची सवय नाही न् आवड-सवडपण नाही. त्यामुळे असा लोंढा परतवून लावायची सोय माझ्यापुरती करून घेतलीय मी. मानभावी वाटेलही कदाचित. काय करणार तरी मग? उगीच कामधाम नसणारी आपली मित्रमंडळी इकडचं तिकडे न तिकडचं इकडं कॉपी पेस्ट करण्यात प्रचंड मशगूल आणि तरबेज असतात! काही सन्माननीय अपवाद असतात म्हणा, आहेतही! मी आपलं हिरवं दिसलं की ओपन करतो न् पुढे सरकतो. बस्स. काय काय वाचायचं? मोठं दिव्य असतं ते. वर्षभरापूर्वीचं ही मंडळी ताजं म्हणून पाठवतात. ते शिळं होऊन कुबट झालंय याचा त्यांना मागमूसही नसतो. वैताग नुसता. मी आपलं पाट्या टाकत होतो, की दत्तानं पाठवलेली पत्रिका झूम करून बघितली सहज. तितक्यात एकाचा ' विवाहास आमच्या शुभेच्छा ' असा संदेश धडकला. क्षणभर वाटलं, मित्र बहिणीच्या लग्नाचं निमंत्रण देतोय, न् तुम्ही तोंडदेखलं मेसेज काय करताय लेको? पेक्षा जायला हवं आपण!
झालं, निर्णय झाला. मग दत्ताला विचारलं, मेसेज करून हं! हेलसला कसं यायचं? सविस्तर मार्ग कळल्यावर हायकोर्ट एक्सप्रेसनं जायचं पक्कं ठरवून झोपी गेलो.
डोक्यात हेलस असल्यानं न् धसकीनं (की उत्कंठेनं?) पहाटे तीनलाच जाग आली. एवढ्या पहाटे काय करायचं म्हणून पुन्हा आडवा झालो, ते सहाला डोळा उघडला. पूर्वी शाळेला झेंड्याला जाताना असंच व्हायचं. आता?
गडबडीनं सगळं आवरून तरोडा नाक्याला येऊन थांबलो. मिळेल त्या वाहनानं जायचं पण जायचंच, या निश्चयानं. नशीब बघा, एरव्ही जिथे जायचं तिकडची गाडी हमखास मिळत नाही. पण चक्क इनोव्हा कारचा लाभ घडला. थेट मंठ्यापर्यंत. मस्त एसीत जुनी कर्णप्रसन्न गाणी ऐकत साडेआठलाच मंठा गाठलं. दत्ताला सांगितलं, मंठ्यात पोचलोय. तुमचं चालूद्या. मी वेळेवर पोचतो.
मला चांगलं चुंगलं खायची भारी हौस! तिथं चौकशी केली, चांगली खिचडी कुठं मिळते म्हणून! एकदोघांनी सांगितलेल्या क्रांती हॉटेलमध्ये गरमगरम खिचडी भजे चोपले. थोडं टंगऴमंगळ केलं न् डुगडुगीनं हेलस फाट्यावर उतरलो. तिथून गाव साधारण एकदीड किलोमीटर असावं. लग्नाच्या बॅण्डचा आवाज कानावर येत होता. छान मराठी गाणं वाजत होतं. मग काय त्या गाण्याच्या धुंदीत-मस्तीत आपली तुकाराम एक्सप्रेस निघाली.
गाव जवळ आलं तसं शाळा स्पष्ट होऊ लागली. शाळा म्हटलं की माझं पाऊल पुढे वळत नाही. पण म्हटलं, आधी घरी जाऊ. दत्ताला आनंद वाटेल. घर गावाच्या दुस-या टोकाला!
पुसत पुसत गावाची परिक्रमाच केली. जुनी माळवदाची घरं. जवळपास काटकोनातले रस्ते. नवा सिमेंटचा स्पर्श झाला तरी हटवादीपणानं चिटकून राहिलेलं जुनं उदासपण. काही घरं मात्र खानदानी. नव्या पिढीनं बापजाद्यांचं वैभव टिकवून ठेवल्याची साक्ष देणारी! रस्त्याच्या कडेला लागूनच लाकडी नक्षीदार खांबावर आपलं मोठेपण तोलून धरलेली घरं. तीन चार फुटाचा ओटा न् मागे सुबक कारागिरीनं सजलेले दरवाजे. सगळ्या गावात असणारे अडथळेही रस्त्यात! कुठं बैलगाडी, कुठं मोटार सायकल. पाण्याचं दुर्भिक्ष असूनही रस्त्यावर वाहणारं पाणी. सगळं आपल्यासारखंच. पण माणसं मोठी प्रेमळ. अगत्य असलेली. विचारलं की सविस्तर सांगणारी.
गावाच्या उत्तरेस कालिका माता मंदिरात लग्नाची गडबड सुरू होती. पोरंसोरं इकडून तिकडं हुंदडतायत. माझ्या परिचयाचं कोणीच नाही. दत्ता पूजेला बसलेला. प्रसाद नावाच्या नवोदयला सिलेक्ट झालेल्या मुलाशी दोस्ती केली. त्यानं शाळेची ब्ल्यू प्रिंटच काढली की. लग्न साडेबाराला. आता तर दहा झालेत. मग सरळ पूर्वेला नदी होती आटलेली. नदी कसली लहान ओहळ तो. तिकडे मोर्चा वळवला, दाट सावलीचं झाड बघून गवतावर पसरलो मग. परन्या वापस मंदिरात आल्या तशा बॅण्डच्या वाढल्या आवाजानं जाग आली.
लग्न झालं. दत्तानं मंदिराचे अध्यक्ष तळणीकरांकडून श्रीफळ देऊन मानपान केला माझा. (पण श्रीफळ विसरलो तिथंच). पंक्तीतल्या जेवणाचा आनंद मात्र मनमुराद घेता आला नाही. पण गावक-यांशी बोलून अधिक पोट भरलं. मंदिराचे ट्रस्टी तिथं लग्नाचा सगळा भार उचलतात. किती ही मोठी लोकसेवा. दत्ता आणि त्यांच्या मित्रांनी गतवर्षी मंदिराचा भक्कम पक्का मंडप उभारलाय. गावासाठी खूप जीव लावतात सारे. पण अजूनही मंदिरात आरती सुरू झाली की अंगात येतं लोकांच्या. माझ्या नजरेतल्या प्रश्नाला दत्ताचं उत्तर, हे अजून करायचं राहिलंय. गंमत म्हणजे, अंगात येणारे बव्हंशी सुशिक्षित न् सरकारी नोकरदार. दत्ताची खंत आणि तळमळ अनुभवली. इतक्या दुरून आलो म्हणून तुकारामाची सोबत दिली सेलूपर्यंत. तिथून तपोवन हुकल्यानं एस्टीनं परभणी न् मग दीक्षाभूमी एक्सप्रेसनं रात्री दहाला नांदेड. पांडू घ्यायला आला म्हणून घर लवकर जवळ आलं.

मात्र एवढी दगदग झाली तरी, दत्ताच्या पत्नीचं अगत्य, नदीकाठावर सद्य परिस्थितीवर अभ्यासपूर्ण मत मांडणारा संदीप, गावाच्या लळ्यानं अजूनही शहराचा न झालेला दत्ता आठवत राहिला न् थकवा पार पळून गेला..
अशा अनाहूत ओढीनं अजूनही आपण आपलं ताजेपण जगू शकतो हा आनंद खूप वर्षांनी पावला.. कारण दत्ता हेलसकर... त्याचं मानव्यासाठी झिजणं...

(हे लेखन दत्तानं वाचलं होतं.)

दत्ताची आठवण

दत्तात्रय हेलसकर... साने गुरुजी कथामालेसाठी आयुष्य समर्पित केलेला जिव्हाळ कार्यकर्ता शिक्षक.... ५ सप्टेंबर २०१५ रोजी शिक्षक दिनी...