शनिवार, २८ मे, २०२२

काळीजकुपीतील गोष्ट...

साहेबांच्या सहवासातील एक आठवण...



शहाण्णव सालची गोष्ट आहे. मी शिक्षक असतानाची. तेव्हा आदरणीय कळमकर साहेब एमपीएसपीला प्रकल्प उपसंचालक होते. एमपीएसपीकडून प्रकाशित होणाऱ्या 'शिक्षक मित्र' मासिकासाठी नांदेड जिल्ह्यातील हरसद येथील प्राथमिक शाळेच्या उपक्रमाचं लेखन घेऊन मी मुंबईला गेलो होतो.  लोहा तालुक्यातील हरसद येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवा कांबळे हे विद्यार्थी उपस्थिती वाढावी यासाठी दररोज प्रभात दिंडी काढायचे. त्या उपक्रमाचं ते लेखन होतं.
एके दिवशी तत्कालीन शिक्षणाधिकारी डॉ गोविंद नांदेडे साहेब मला अचानक म्हणाले, मुंबईला जातोस का? मी लगेच 'हो सर' म्हणालो. कारण सरांना नकार देण्याच्या परिणामाचा तेव्हा ताजा अनुभव होता!
पुन्हा म्हणाले, कधी गेला होतास का? मी म्हणालो, नाही. पुन्हा प्रश्न, मग कसा जातोस? मी उत्तरलो, कसाही.
मग लेखाधिकारी वडकुते साहेबांना बारीक सारीक तपशील विचारून संध्याकाळच्या रेल्वेने मुंबईला निघालो. 
व्हीटीला ( आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) सहा वाजता उतरलो आणि पायी दिंडी सुरू केली. व्हीटी वरून सरळ पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी गाठून, चर्नी रोडच्या फुटपाथवरून महाकाय शहराचं दडपून टाकणारं अजस्त्र रूप न्याहाळत निघालो. वीसेक मिनिटांत जवाहर बालभवन दिसलं आणि जीव सुखावला. गिरगाव चौपाटीवर महापालिकेच्या स्वच्छतागृहात अंघोळ केली. मुंबई शहराचं इतकं कौतुक ऐकलं होतं की, अंघोळीला जाताना ब्रिफकेस बाथरूममध्ये घेऊन गेलो होतो.

साधारण नऊ वाजता मी बालभवनाच्या पायरीला होतो. प्रकल्प संचालक कार्यालयाचं कुलूपही उघडलं नव्हतं. मी रस्त्यावरील रहदारीचा आणि समुद्रावरून येणाऱ्या दमट वाऱ्याचा आनंद घेत बाजूला थांबून होतो. साडेनऊ वाजता शिपाई आले. बरोब्बर दहा वाजता साहेब आले. थेट कार्यालयात गेले. मीही लगेच गेलो.
साहेबांना परिचय दिला. समोरच्या खुर्चीकडे निर्देश करत बस म्हणाले. मी जरा अवघडलो. इथे साधं केंद्रप्रमुख आले तर खुर्चीत बसण्याची हिंमत नव्हती आणि थेट राज्याचे उपसंचालक आपणाला बसायला सांगताहेत! खरं सांगायचं तर मी संकोचलोच. साहेब पुन्हा म्हणाले, अरे बस ना.  मग धाडस करून बसलो अखेर समोर.
साहेबांनी चहा घेतोस का असं विचारत चहा मागवला पण. समोर बसणं एकवेळ ठीक होतं. पण सोबत चहा घ्यायचा म्हणजे तर माझ्यासाठी खूप होतं. चहा घेता घेता साहेब माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलत राहिले. नांदेडे साहेबांची आणि नांदेडची ख्यालीखुशाली विचारत राहिले. 
मी सोबत आणलेलं लेखनाचं पाकीट साहेबांना दिलं आणि मी येऊ का साहेब म्हणून निघण्याची परवानगी विचारली. तर म्हणाले, अरे थांब थोडं. इतक्या लांबून आलास तर साहेबांना भेटून तर जा. साहेब बारा वाजता येतात. भेटलास की जा मग. तेव्हा डॉ संजय चहांदे साहेब प्रकल्प संचालक होते.
माझा नाइलाज झाला. थोडं घुटमळत थांबलो. लगेच साहेब म्हणाले, मुंबईला कधी आला होतास का?
मी: नाही साहेब.
साहेब: मुंबई बघायची का?
मी: हो साहेब.( एकही क्षण न दवडता)
साहेब: मग असं कर, खाली उतरलास की डाव्या बाजूला चालत जा. जवळच बसस्टॉप आहे. तिथून या या नंबरची बस पकडून सरळ गेट वे ऑफ इंडिया ला उतर. तेवढं बघितलंस तरी अर्धी मुंबई बघितल्यासारखं आहे.
होय सर म्हणून मी आनंद आणि उत्सुकतेने साहेबांनी सांगितल्यानुसार गेट वे ऑफ इंडिया ला गेलो. तेव्हाचा आनंद आठवून आजही मला साहेबांची खूप कृतज्ञता वाटत राहते.
पहिल्यांदा मुंबई आणि गेट वे ऑफ इंडिया, ताजची भव्यता, सकाळी साडेदहाची वेळ असूनही माणसांची वर्दळ, माझ्यासाठी हे सगळं खूप अप्रूप होतं.
योगायोग म्हणजे त्या दिवशी माझा वाढदिवस होता. ताजच्या समोर उभा राहून एक फोटो घेतला. साठ रुपये लागले!
तासभर जिवाची मुंबई करून पुन्हा माघारी बालभवनला गेलो. चहांदे साहेब आले होते. साहेबांनीच त्यांना माझ्याबद्दल माहिती दिली. चहांदे साहेबांनी हलकसं हसत माझ्याकडं 'वा, छान' अशा नजरेनं पाहिलं. मी परवानगी घेतली आणि प्रकल्प संचालक कार्यालयाच्या पायऱ्या उतरून खाली आलो.
तेव्हाचं साहेबांचं मातृरूप मला आजही जसंच्या तसं आठवतं. एका सामान्य शिक्षकाला राज्याचे उपसंचालक इतक्या मायाळूपणे वागवतात हे खूप आश्चर्यकारक होतं माझ्यासाठी.
साहेबांमुळं मला मुंबईचं वैभव पाहता आलं. त्यांच्यासोबत चहा घेता आला. 
आज साहेब गेल्याची बातमी कळली आणि काळजात चर्र झालं.
एक देवमाणूस आपल्यातून निघून गेला...

विनम्र श्रद्धांजली...


५ टिप्पण्या:

दत्ताची आठवण

दत्तात्रय हेलसकर... साने गुरुजी कथामालेसाठी आयुष्य समर्पित केलेला जिव्हाळ कार्यकर्ता शिक्षक.... ५ सप्टेंबर २०१५ रोजी शिक्षक दिनी...