मनाच्या अथांग सरोवरावर उठणारे निळे तरंग
त्यावरल्या शुभ्रश्वेत राजहंसाच्या कमनीय मानेची
विस्तारत, तोडत नेतात, आकर्षक बिंबे
पाहता पाहता त्या निळ्या चित्रफलकावर
उठतात लक्ष लक्ष प्रतिमा.
तसे चित्र मनात आहे.
पण मित्रा,
प्रतिमेतल्या त्या लक्ष राजहंसाचे पंख
निवले विझले आहेत
तुझे अग्निपंख आता कुठून आणू?
मृत्यूच्या पंखांची सावली तर माझ्यावर पडली होती
तशात मी म्हणालो
"वेड्या, वर्तमानाच्या फार पुढं धावू नकोस"
बघ, आता आम्ही किती मागं राहिलो.
कांचेच्या भींगातून होणाऱ्या सूर्यकिरणांच्या
टोकदार केंद्रीकरणासारखी तुझी प्रज्ञा
तीक्ष्ण वेध घ्यायची विषयांचा.
अन् विवेकानं चेतवलेला तुझा सामर्थ्यवान अहम्
पिंजून काढायचा सारे विषय
प्रमेयांची सिद्धी प्रक्रिया तुझ्या एवढ्या स्पष्टतेनं
आता तरुणाईपुढं कोण ठेवणार?
एवढी संक्षिप्त, एवढी गणिती, एवढी तर्कप्रसन्न?
शब्दांचे फुगवटे वाढवणारे
खूप आहेत शब्दसम्राट.
पण आता कोण दाखवणार त्या जिप्सी जादुगरिणीसारखे
विषयाच्या लखलखीत कांचगोळांत
आशयाचे इंद्रधनुष्य?
विचारांचे जवाहिर दीपवून टाकायचे
जवळच्या रत्नखचित जडावांनी.
पण विषयाचे लचके तोडणारा
तुझ्या प्रज्ञेचा तीक्ष्ण दांत
त्या जडावांहून मौल्यवान होता.
अन् त्या दातांआडची चौकस जीभ
न भागणारी तहान लेवून होती.
वास्तव्याच्या जाणीवांना वाचा यावी
तसं बोलायचास,
प्रज्ञेच्या दाहक हुंकारासारखा.
काळोख उजळत येणाऱ्या किरणांसारखा यायचा तुझा शब्द
नीतीच्या वाटा प्रकाशत
आयुष्याचे अर्थ दाखवत.
त्यातून दिसायचे नवे प्रश्न नव्या दिशा
कुणाला गवसायचा प्रकाश कुणाला संधी
तर कुणाला सांपडायचे ते स्वतःच.
बोलण्यात शब्दांची आतषबाजीही असायची
त्यातल्या ठिणग्यांनी अनेकांना भाजल्यासारखेही व्हायचे
त्यात होतं,
जुगारी माणसाचं झोकून देणारं साहस
पटाईत कुस्तीगीराचे समयज्ञ डावपेच
श्रोत्यांच्या मन-मेंदूत उठणारे तरंग टिपण्याचं संवेदनशील
कसब
अन् या साऱ्यात साधलेलं सभ्यतेचं संतुलन.
म्हणून तुझा शब्द जागवायचा तरुणाईत सर्जनशील तणाव
अन् त्या शब्दांचा व्रणही अंकुरित व्हायचा
आपल्या इवल्या टोकावर तोलत
उद्याच्या स्वप्नांचे आकाश.
झोक्यावरून झुलणाऱ्या सर्कस सुंदरींच्या सहजतेनं
झेपावायचास संस्कृतींच्या उच्चतर शिखरावरून
अन् कधी आपल्या विज्ञान-पंखांनी भरारी घ्यायचास
दूरदूरची शतके जोडणारी.
त्या खेळानं दिपलेलं प्रेक्षागार भानावर येऊन
करायचं टाळ्यांचा कडकडाट
तेव्हा त्या रसिकतेची त्याच डौलदार सुंदरींच्या
नम्र नखव्यानं हंसून घ्यायचास दाद.
तुझ्या गळ्यात तेव्हा दिसायचे
पारितोषिकांच्या मोत्यांचे अदृश्य सर
गतिमान प्रज्ञेला वाचनाचे व्यसन होते...
तर्कशुद्ध अन् प्रयोगसिद्ध प्रमेयांचा ध्यास होता.
म्हणून राजकारणाच्या सर्कशीतलं
ताणल्या तारावर चालायचं तंत्र तुला जमलं नाही.
तुला साधणारं नव्हतंच
त्या प्रयत्नांत तोलही गेला अन् तारही गेली.
मग समन्वयाचं संतुलन पाहायला सोकावलेल्या
प्रेक्षकांच्या वर्गातून आवई उठली
पावलं चुकीची पडल्याची
इथं आम्हाला अन्याय अत्याचारांशी
यशस्वी समझोते पाहण्याची सवय आहे.
सारेच गुलाम आहेत राजकीय अस्त्रागारांचे
वेगवेगळ्या रंगांची अन् ‘आय्’ पासून ‘यू’ पर्यंतची
लेबलं असणारी शौकीन वस्त्रं आहेत इथं.
बलबात जातानाचे पातळ वेगळे
अन् हळदी-कुंकू करतानाचे वेगळे.
या वस्त्रग्रस्तांच्या जमातीत
माणुसकीच्या मंत्रदृष्ट्यांचे जे व्हायचे
तेच तुझे झाले.
सगळ्याच वेड्यांनी एकमताने डॉक्टरला वेडा ठरवावे
असे आम्ही तुला वेडे ठरवले.
अन् मग तुला बडवून काढायला उचलल्या वाचाळ लेखण्या.
माझ्या स्वप्नाच्या ओसाड किनाऱ्यावर
तुझ्या प्रेमाची भरती आली.
तेव्हा खूप उशीर झाला होता.
म्हणालास, 'हे महारोगी, ही रुग्णसेवा
हे आहे सारं साधन मात्र.'
जे इथं थांबतील ते धुक्याच्या पडद्यापाशी राहतील
जे आंत घुसतील माझ्या सारखे
महारोगी, ही रुग्णसेवा
त्यांना दिसेल तुझ्या चेतनाचा उदात्त स्वार्थ
अन् तू चालवलेली प्रकाश-साधना.
आपले नास्तिक्य गर्जून सांगितलेस
पण दोस्ता, तुझे आस्तिक असणे मला कळले होते.
कारण एकदा, फक्त एकदाच तुला घायाळ झालेले मी पाहिले
तेव्हा तुझ्या श्रद्धा जखमी झाल्या होत्या.
आणखी एकदा तू गोंधळलास
तेंव्हाही मी व्यथित झालो
मौलिक उद्दिष्टे अन् करंटी माणसे
की करंटी उद्दिष्टे अन् मौलिक माणसे.
या वादात तुझ्यातल्या माणुसकीला तोतरेपणा आलेलं पाहून
पौर्णिमेसारखीच येते अमावस्याही अटळपणे
पण दोस्ता, आपल्या वाट्याला आलेल्या
अमावस्येच्या रात्रीही अंधाऱ्या नव्हत्या.
अरे, असल्या रात्रीच दाखवतात मैत्रीचे दूरस्थ ग्रहतारे
काळया ढगांच्या किनारीच लेवून असतात
प्रकाश किरणांचे दीप्तीमान गोठ
प्रकाशाची अशी किनारच मला दाखवते
तिच्या पोतात दडलेली काळया ढगांची अभागी लेणी
तू राहायला हवं होतंस.
तुझे काँटेरी कंगोरे आता झिजूं लागले होते
अन् आंतले तुरट आंबटपण गोडवा घेऊ लागले होते.
चर्चेत चव असल्याचं अन् चोथा नसल्याचं
मतभेदात मैत्री असल्याचं अन् विद्वेष नसल्याचं
सर्वमान्य होत होतं.
तू कसलेली विचारांची शेतं
पाहिली पहिली कणसं धरत होती.
अन् कणसांच्या कसदार दाण्यांत
भरू लागलं होतं टचटचून दूध.
त्या दुधाच्या मुक्या हाळीनं
झेपाऊ लागले होते पाखरांचे थवे दाही दिशांनी
विचारांच्या सुगीचे स्वप्न साकारत असताना
कोसळलास.
ही कविता नव्हे
श्रद्धांजलीही नव्हे
माझ्या मुक्या अश्रूंचे दोस्ता,
हे आहे निरोपाचे अभिवादन!
चिंतन : बाबा आमटे
शब्दांकन : सुरेश द्वादशीवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा